राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.. या आपदग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मदत करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात होती. अखेर आज (ता. 10) शिंदे सरकारने या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे..
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज लगेच कॅबिनेटची बैठक झाली.. त्यात राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 13,600 रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.. तसेच, 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली..
निकषांपेक्षा अधिक मदत
बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे झाले आहेत. राज्यात जवळपास 15 लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं आहे.. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विशेष बाब म्हणून आतापर्यंतची सर्वाधिक नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे..”
‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार, शेतकऱ्यांना हेक्टरी 6800 रुपये मदत केली जाते.. मात्र, या निकषांच्या दुप्पट म्हणजे, 13,600 रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, दोन हेक्टरची मर्यादा वाढवून तीन हेक्टर केल्याने शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.
मुंबई मेट्रो-3 च्या वाढीव बजेटला मान्यता
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचा मूळ खर्च 23,136 कोटी होता, तो आता 33,405 कोटी 82 लाख रुपयांवर गेला आहे.. प्रकल्पाच्या या वाढीव खर्चात केंद्र सरकारनेही मदत करावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले..
तसेच, रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे सांगण्यात आले.. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांची ही पहिलीच बैठक होती.. त्यात नुकसान भरपाईचा मोठा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे..